Swar Vigyan

डॉ.केतकर रस्त्यावरील डॉ.कलमाडी प्राथमिक शाळेत वाद्यामागील विज्ञानाची माहिती देणारा ‘स्वरविज्ञान’ हा अत्यंत बहारदार कार्यक्रम सादर झाला.

 

डॉ.प्रमोद गायकवाड यांनी सुंद्री या वाद्यावर दोन गाणी वाजवून थोडक्यात माहिती देऊन राग नटभैरव राग वाजवला.यानंतर ओंकार इंगवले यांनी ढोलक,ढोलकी या वादयाबद्दल माहिती,पारंपरिक लोककलेतील ढोलकी सोलो वादनात दमदार ठेके,तुकडे वाजवून विविध प्रांतातील ढोलक वादन शैलीचे दर्शन घडवले.ज्येष्ठ क्लॅरिओनेटवादक श्री.रविशंकर आगलावे यांनी आपल्या वाद्याचे भाग दाखवून मुलांसाठी काही गाणी व राग मधूवंती वाजवला.त्यानंतर मुंबईस्थित घटम वादक श्री.स्वामीनाथ जयरामन यांनी घटम वर तिस्त्र,चतुस्त्र,जातींचे बोल वाजवले.विविध बोल म्हणून दाखवले.

 

संगीत शिक्षिका डॉ.राजश्री महाजनी आणि माधुरी पुराणिक यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. राग यमन वर आधारित आरोहावरोह, बंदिश,सरगमगीत,काही गाणी यातून इयत्ता तिसरी आणि चौथीच्या निवडक विद्यार्थ्यांसह गाऊन यमनरंग-मेडले अतिशय बहारदार सादर केला व कलाकारांची शाबासकी मिळवली.त्यामध्ये या संगीत शिक्षिका सुद्धा सहभागी होत्या.नंतर सर्व कलाकारांनी एकत्रित यमन रंग अधिकच खुलवला.

 

घटम व ढोलकी यांचे एकत्रित तालवादन आणि साथसंगतीमुळे तसेच सुंद्री व क्लॅरिओनेट यांच्या दमदार वादनात सर्व सभागृह रंगून गेले.सुंद्री बरोबर नीतिन दैठणकर यांनी चौघड्यासाठी तर ढोलकी साठी टाळ व घुंगरूसाठी मंगेश जोशी यांनी साथ देऊन रंगत वाढवली.सुंद्री साठी सुजाता कुलकर्णी, क्लॅरिओनेटसाठी फैझा सय्यद,घटम साठी पूनम नाडकर्णी, ढोलक,ढोलकीसाठी अर्चना काजळे यांनी विशेष प्रयत्न करून, प्रत्येक वाद्यातील मनोरंजकपणे विज्ञान सांगताना काही कृती वा प्रयोग करून दाखवले.

 

चारही वाद्यामधील ध्वनी निर्मिती साठी आवश्यक असलेले घटक ,फुंकवाद्याचीअसलेली घडण, वाद्याची रुंदी आणि उंची यांमुळे निर्माण होणारा नादभेद, शाई वा पुडीच्या,कणकेच्यामुळे होणारी आवाज निर्मिती, तसेच बदलत्या केंद्रस्थानामुळे वेगळा आवाज, अशा पध्दतीने प्रत्येक शिक्षिकेने विज्ञान उलगडून सांगितले.त्याचवेळी ज्योती वखारे,सोनाली शिंदे या संगणक शिक्षिकांनी विविध पीपीटी स्लाईड्स प्रात्यक्षिके दाखवून अत्यंत दर्शनीय केल्याने सहज सोपे विज्ञान उलगडत गेले.तांत्रिक साहाय्य प्रांजल तांबे आणि केदार कुलकर्णी,यांनी केले.प्रणिता घंटी व संगीता हांडे यांनी वाद्यांची चित्र आकर्षकतेने सजवली.स्वर आणि विज्ञानाचा अन्योन्य संबंध दाखवण्याची संकल्पना मुख्याध्यापिका ज्योती कडकोळ यांची होती.

 

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अश्विनी देशपांडे आणि रश्मी वठारे यांनी केले.यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री.कुशल हेगडे,उपाध्यक्षा श्रीमती इंदिरा सालीयन पर्यवेक्षिका नीता भारती,नेहा जोशी,लीना काकाणी,काही पालक तर ऑनलाईन उपस्थिती मध्ये शाळेचे नियामक मंडळ सदस्य तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेल्हे येथील शाळांचे काही विद्यार्थीही होते.

Report from Velhe school teacher:

आज कावेरी ग्रुप ऑफ स्कूलच्या श्री कलमाडी शामराव प्राथमिक शाळे तर्फे स्वर विज्ञान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये विविध वाद्यांचे प्रसिद्ध वादक सहभागी झाले होते. कार्यक्रमाद्वारे सुरुवातीला शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक वाद्यामागे दडलेला इतिहास व त्यामागे दडलेले विज्ञान हे प्रेझेंटेशन च्या माध्यमातून सर्वांच्या समोर उलगडून दाखवले.

 

यात समाविष्ट असलेली वाद्ये होती – सुंदरी, त्याचा उगम सोलापूर जिल्ह्यात झाला. त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये हमखास वापरल्या जाणारे वाद्य म्हणजे ढोलक व आपल्या महाराष्ट्रातील लोककलेचा अविभाज्य अंग असलेले वाद्य म्हणजे ढोलकी या दोन्ही वाद्याबद्दल माहिती देण्यात आली.

 

क्लॅरिनेट हे जरी विदेशात उगम पावलेले खाद्य असले तरी त्याने आपल्या भारतीय संगीतक्षेत्रात मानाचे स्थान मिळवले आहे. त्याचाही इतिहास व त्यातील विज्ञान सुंदर रित्या सर्वांच्या समोर मांडण्यात आले.

 

त्यानंतरचे वाद्य म्हणजे दक्षिण भारतातील सुमधुर नाद उत्पन्न करणारे घट्टम्. घट या शब्दापासून निर्माण झालेला घट्टम्. घट म्हणजे माठ. जरी आपल्या भाषेमध्ये माठ हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जात असला तरी त्यातून निघणारे संगीत हे नक्कीच अमृताचा अनुभव देणारे होते.

 

शाळेतील विद्यार्थ्यांनी राग यमन या रागावर आधारित आरोह-अवरोह व त्यानंतर सुमधुर अभंगांचे गायन केले. कान तृप्त होत आहेत असे वाटतानाच ज्याला आपण सोनियाचा कळस असे म्हणून ते म्हणजे जुगलबंदीची संधी आपल्याला प्राप्त झाली. या वादकांनी क्लॅरिनेट, सुंदरी, चौघडा, तबला, ढोलकी व घट्टम् यांच्या सहायाने सुमधुर अशी कर्णमधुर व कर्ण तृप्त करणारी जुगलबंदी सादर केली.

 

कार्यक्रमाचा शेवट वाद्याच्या संगीतातील गजाननाच्या जयघोषाने झाला व त्यात सहभागी होण्याचा मोह आपल्या सर्वांना टाळता आला नाही.

 

शेवटचे क्षण हे दुग्धशर्करा योग म्हणावे असेच होते. डोळे कार्यक्रम पाहत होते, कान अमृत प्राशन करत होते व मन एका वेगळ्याच विश्वात संचार करत होते.

 

अशा या अविस्मरणीय कार्यक्रमाचा आनंद आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेल्हे बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी मनमुरादपणे लुटला.

 

त्याबद्दल सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या आयोजकांचे, कलमाडी शामराव प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षकांचे, तसेच हा सुंदर अनुभव देणाऱ्या सर्व वादकांचे व या कार्यक्रमाला कळत न कळत हातभार लावलेल्या सर्वांचे खूप खूप आभार.

 

धन्यवाद.
विद्यार्थी व सर्व शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेल्हे बुद्रुक
तालुका वेल्हे जिल्हा पुणे

Archives

Categories

Back to Top